अभंग lyrics _भैरवी / विनवणी/ उपसंहार

भैरवी / विनवणी/ उपसंहार

अभंग lyrics



।। ।।

आलो मी शरण तुजला देवा। तुझ्या सेवकांचा संग हा घडावा ।। 

सांभाळी या लेंकरा देवा श्रीगजानना। घडों तुझी नित्य सेवा मजला देवा ।।

 तुका म्हणे एक मुक्तिचें साधन। नाम तें पावन श्रीगजानन ।।


।। ।।

जाणतां जाणतां कां रें वेडा होसी । नाथिल्याच्या पिसी हांव भरी ।। १ ।। 

दोन दिवसांचे उसणे व्यापारी । काय त्यांसी थोर मानितोसी ।। २ ।। 

दिवसांची छाया पूर्व-पश्चिमेसी। तैशी या देहाची स्थिती जाणा ।। ३ ।। 

एका जनार्दनी हरिकृपेंविण । दावील ही खुण कोण बापा ।। ४ ।।


।। ।।

हीन याती माझी देवा। कैसी घडे तुझी सेवा ।। १ ।। 

मज दूर दूर हो म्हणती । तुज भेंटू कवण्या रीती ।। २ । 

माझा लागतांचि कर। सितोंडा घेताती करार ।। ३॥ ।। 

माझ्या गोविंदा गोपाळा । करुणा भाकी चोखामेळा ।। ४ ।।


।। ।।

आंधळ्याची काठी। अडकली कवणें बेटीं ।। १ ।। 

माझिये हरणी। गुंतलीस कोणे रानीं ।। २ ।। 

मुकें मी पाडस । चुकलें भोवें पाहें वास ।। ३ ।।

 तुजवीण काय करूं । प्राण किती कंठीं धरूं ।।४।। 

आतां जीव जाऊं पाहे । धांव घालीं माझे आये ।। ५ ।।

माझी भेटवा जननी। संता विनवी दासी जनी।। ६ ।।


।। ५ ।।

आळवितां धांव घाली। ऐसी प्रेमाची भुकेली ।। १ ।। 

ते हे यशोदेचे बाळा । बरवी पाहातसें डोळां ।। २ ।। 

विटेवरी उभा नीट । केलें पुंडलिकें धीट ।। ३ ।।

स्वानंदाचें लेणें ल्याली। पाहून दासी जनी धाली ।।४।।


।। ६ ।।

आम्ही गावें तुम्हीं कोणी कांहीं न म्हणावें । ऐसें तंव आम्हां सांगितलें नाहीं देवें । । १ । ।

 म्हणा रामराम टाळी वाजवा हातें । नाचा डोला प्रेमें आपुलिया स्वहितें ।। २ ।। 

सहज घडे तया आळस करणें तें काई। अग्नीचें भातुकें हात पाळितां कां पायीं ।। ३ ।। 

येथें नाहीं लाज भक्तिभाव लौकिक। हांसे तया घडे ब्रह्महत्या पातक । । ४ । । 

जया जैसा भाव निरोपण करावा। येथें नाहीं चाड ताल विताल या देवा ।। ५ ।। 

सदैव ज्या कथाकाळीं घडे श्रवण । तुका म्हणे येर जन्मा आले ते पाषाण ।। ६ ।। 


।। ७ ।।

मागणे हे माझे स्वामी तुजपाशी। विघ्न भजनासी आणू नये... । । धृ ।। 

तुझाची निरोप सर्वाशी मी देतो। तुझे नाम गातो आवडीने... । । १ । । 

तेथे ही उपाधी न बाधो सर्वथा। बाप दीनानाथा सांभाळावे... ।। २ ।। 

स्वामी सूत म्हणे तूची बाप धनी। सांभाळी भजनी बालकासी... ।। ३ ।।


।। ।।

का हो देवा उशिर झाला । कां हो माझा विसर पडला... ।। धृ ।। 

तुझ्यासाठी देवा सोडिले घरदार। तुझ्यासाठी देवा सोडिला संसार ... । । १ । । 

तुझ्यासाठी देवा धरली एकादशी। तुझ्यासाठी देवा राहीलो उपाशी... । । २ । ।

 जनी म्हणे देवा झाले मी निसंग। भजनात दंग माझा पांडूरंग ... ।। ३ ।।


।। ।।

इवलेसे रोप लावियलें व्दारी। त्याचा वेलू गेला गगनावरी ।। धृ ।।

 मोगरा फुलला मोगरा फुलला। फुलें वेचिताचीं भारुं कलियांसी आला ।। १ ।। 

मनाचिये गुंती गुंफियेला शेला। बापरखुमादेवीवरू विठ्ठले अर्पिला ।। २ ।।


।। १० ।।

माऊली गुरु माऊली। आमुची ज्ञानेश्वर माऊली।। धृ।। 

धाव घेई अलंकापूरी। नदी इंद्रायणीच्या तीरी ।। १ ।। 

सोनियाचा पिंपळ महाव्दारी। पोथी वाचावी ज्ञानेश्वरी ।। २ ।। 

पाहू सिध्देश्वर मंदिर। नामा तयाचा किंकर ।। ३ ।।


।। ११ ।।

समाधीमधुनी ज्ञानेश्वरांच्या। अजुनी येती स्वर।

 विश्वची माझे घर अवघे । विश्वची माझे घर ।। धृ।। 

जन निंदेचे वादळ सोशित। भागवतेचा ध्वज फडकावित।

मनामनातून निर्माण केला। भक्तीचा पाझर ।। १ ।। 

शारदेची अक्षरे वेचूनी। गीता मराठी जनास सांगूनी। 

ज्वलंत करुनी ज्योती समया। प्रकाशिले अंबर ।। २ ।। 

वारकऱ्यांच्या दिंड्या निघाल्या । करती जयजयकार करती जयघोष -

 "ज्ञानोबा माऊली तुकाराम"

सर्व ठिकाणी एकची आहे। केवळ तो ईश्वर ।। ३ ।।


।। १२ ।।

किती आनंदी आनंद। या झोपडीत माझ्या।।धृ।।

भूमीवरी पडावे। आकाश पांघरावे ।

ताऱ्यांकडे पाहावे, या झोपडीत माझ्या ।। १ ।।

पेट्या आणि तिजोऱ्या। त्यातून होती चोऱ्या ।

दारांस नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ।। २ ।। 

येता तरी सुखे या। जाता तरी सुखे जा।

तुकड्या मनी वसा या, या झोपडीत माझ्या ।। ३ ।।


।। १३ ।।

जातो माघारी पंढरीनाथां। तुझे दर्शन झाले आतां।।धृ।। 

तुझ्या नादाने पाहिली मी । देवा तुझीच रे पंढरी।। 

धन्य झालो आम्हीं जन्माचें । नाम घेऊ तुझे आवडीने।।१ ॥

 दीपविली तुझी पंढरी। चालू झाली भक्तांची वारी ।

तुका म्हणे भक्ती करा तुम्हीं। जाती पापें जन्मांची पळोनी । । २ ।।


।। १४ ।।

करितों विनवणी । हात जोडोनियां दोन्ही ।। १ ।।

हेचि दयावे मज दान। करा हरिचें चिंतन ।। २ ।।

जातों सांगूनियां मात। पांडुरंग बोलावित ।। ३ ।। 

सोडा द्वादशी पारणें । सुखें करावें कीर्तन ।। ४ ।।

दिवस मध्यान्हीं आला। सेना वैकुंठासी गेला ।। ५ ।।


।। १५ ।।

लागोनियां पायां विनवितों तुम्हांला। करें टाळी बोला मुखीं नाम । । १ । ।

 विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळां । हा सुख सोहळा स्वर्गी नाहीं । । २ । । 

कृष्ण विष्णु हरि गोविंद गोपाळ । मार्ग हा पंजाळ वैकुंठींचा ।। ३ ।। 

सकळांसीं येथें आहे अधिकार। कलियुगीं उध्दार हरिनामें । । ४ । । 

तुका म्हणे नामापाशीं चारी मुक्ति । ऐसें बहुतां ग्रंथीं बोलियेलें । । ५ । ।


।। १६ ।।

करुनि विनवणी पायीं ठेवितों माथा ।

परिसावी विनंती माझी पंढरीनाथा ।। १ ।। 

अखंडित असावेंसें वाटतें पायीं ।

साहोनि संकोच ठाव थोडासा देईं ।। २ ।। 

असो नसो भाव आलों तुझिया ठाया।

कृपादृष्टि पाहें मजकडे पंढरीराया ।। ३ ।।

 तुका म्हणे तुझीं आम्ही वेडीं वाकुडीं । 

नामें भवपाश हातें आपुल्या तोडीं । । ४ । ।


।। १७ ।।

पाहें प्रसादाची वाट । द्यावें धुवोनियां ताट ।। १ ।।

शेष घेऊनि जाईन। तुमचें झालिया भोजन।। २ ।। 

झालों एकसवा। तुम्हां आडुनियां देवा । । ३ । ।

तुका म्हणे चित्त । करुनि राहिलों निश्चिंत ।।४।।


।। १८ ।।

कृपाळु सज्जन तुम्ही संतजन । हेंचि कृपादान तुमचें मज ।। १ ।। 

आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा। कींव माझी सांगा काकुळती । । २ ।। 

अनाथ अपराधी पतित आगळा। परि पायां वेगळा नका करूं।।३।।

 तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी। मग मज हरि उपेक्षीना । ।४ । ।


।। १९ ।।

शेवटींची विनवणी । संतजनीं परिसावी । । १ । 

विसर तो न पडावा। माझा देवा तुम्हांसी ।। २ ।। 

पुढें फार बोलों कायी। अवघें पायीं विदित।। ३ ।। 

तुका म्हणे पडिलों पायां। करा छाया कृपेची ।।४।।


।। २० ।।

हेंचि दान दे गा देवा। तुझा विसर न व्हावा ।। १ ।। 

गुण गाईन आवडी । हेंचि माझी सर्व जोडी ।। २ ।। 

नलगे मुक्ति धन संपदा। संतसंग देईं सदा ।। ३ ।।

 तुका म्हणे गर्भवासी । सुखें घालावें आम्हांसी ।।४।।


।। २१ ।।

बोलिलीं लेंकुरें। वेडीं वांकुडी उत्तरे ।। १ ।। 

करा क्षमा अपराध । महाराज तुम्ही सिध्द ।। २ ।। 

नाहीं विचारिला । अधिकार म्यां आपुला ।। ३ ।।

 तुका म्हणे ज्ञानेश्वरा । राखा पायां पै किंकरा ।।४।।


।। २२ ।।

झालें समाधान। तुमचे देखिले चरण ।।१।।

आतां उठावेंसें मना। येत नाहीं नारायणा ।। २ ।।

 सुरवाडिकपणें । जेथें सांपडलें केणें । । ३ । ।

तुका म्हणे भोग। गेला निवारला लाग ।।४।।


।। २३।।

करुनि आरती। आतां ओवाळू श्रीपती । । १ । । 

आजी पुरले नवस । धन्य काळ हा दिवस ।। २ ।। 

पाहा वो सकळां । पुण्यवंता तुम्हीं बाळा ।। ३ ।।

तुका वाहे टाळी। होता सन्निध जवळीं । । ४ । ।


।। २४।।

प्रेम सप्रेम आरती । गोविंदातें ओंवाळती ।। १ ।। 

धन्य धन्य ते लोचन । नित्य करिती अवलोकन॥ २ ॥

बाळा प्रौढा आणि मुग्धा । ओंवाळीती परमानंदा।। ३ ।। 

नामा म्हणे केशवातें। देखुनी राहिलीं तटस्थें । । ४ । ।


।। २५।।

हेचि व्हावी माझी आस । जन्मोजन्मीं तुझा दास ।। १ ।। 

पंढरीचा वारकरी । वारी चुकों नेदी हरी ।। २ ।।

संतसंग सर्वकाळ । अखंड प्रेमाचा सुकाळ ।। ३ ।।

चंद्रभागे स्नान । तुका मागे हेंचि दान ।।४।।


।।  ज्ञानोबा माऊली तुकाराम ।।



 आमचा लेख कसा वाटलं हे आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा 
|| धन्यवाद ||

No comments

Powered by Blogger.