संतपदी - अभंग

संतपदी - अभंग


।। ।।

भाग्यवंता ऐसी जोडी । परवडी संतांची ।। १ ।।

धन घरीं पांडुरंग। अभंग जें सरेना । । २ ।। 

जनाविरहित हा लाभ। टांचें नभ सांठवणें ।। ३ ।।

तुका म्हणे विष्णुदासां । नाहीं आशा दुसरी ।।४।।


।। ।।

तुम्ही संत मायबाप कृपावंत । काय मी पतित कीर्ति वाणूं । । १ । ।

 अवतार तुम्हां धराया कारण। उध्दरावे जन जड जीव ।। २ ।। 

वाढावया सुख भक्तिभाव धर्म। कुळाचार नाम विठोबाचें ।। ३ ।।

 तुका म्हणे गुण चंदनाचे अंगीं । तैसे तुम्ही जगीं संतजन ।।४ ।।


।। ।।

आम्ही जातों तुम्ही कृपा असों द्यावी। सकळां सांगावी विनंती माझी । १ । । 

वाड वेळ झाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बोलावितो ।। २ ।। 

अंत:काळी विठो आम्हांसी पावला। कुडी सहित झाला गुप्त तुका ।। ३ ।।


।। ।।

तुमचिये दासीचा दास करुनि ठेवा। आशिर्वाद द्यावा हाचि मज । । १ । । 

नवविधा काय बोलली जे भक्ती। द्यावी माझ्या हातीं संतजनीं ।। २ ।।

तुका म्हणे तुमच्या पायांच्या आधारें। उतरेन खरें भवनदी ।। ३ ।।


।। ५ ।।

धन्य आज दिन। संत दरुशनाचा। अनंत जन्माचा शीण गेला ।। १ ।। 

मज वाटे त्यासी अलिंगन द्यावे। कदा न सोडावे चरण त्यांचे ।। २ ।। 

त्रिविध तापांची जाहली बोळवण । देखिले चरण वैष्णवांचे ।। ३ ।।

एका जनार्दनी घडो त्यांचा संग। न व्हावा वियोग माझ्या चित्ता । ।४ ।।


।। ६ ।।

सोनियाचा दिवस आजी झाला। संतसमागम पावला । । १ ।। 

तेणें फिटलें अवघें कोडें। झालें परब्रह्म उघडें ।। २ ॥

एका जनार्दनी सेवा। करीन मी त्यांची भावां ।। ३ ।।


।। ७ ।।

धन्य आजि दिन । जालें संताचें दर्शन ।। १ ।।

जाली पापातापा तुटी । दैन्य गेलें उठाउठीं ।। २ ।।

 जालें समाधान। पायीं विसावलें मन ।। ३ ।।

तुका म्हणे आले घरा। तोचि दिवाळी दसरा ।।४।।


।। ।।

धन्य दिवस आजी दर्शन संतांचें । नांदे तया घरीं दैवत पंढरीचें ।। १ ।।

धन्य पुण्यरुप कैसा झाला संसार । देव आणि भक्त दुजा नाहीं विचार ।। २ ।। 

धन्य पूर्वपुण्य वोढवलें निरुतें । संतांचें दर्शन झालें भाग्ये बहुतें । । ३ । ।

तुका म्हणे धन्य आम्हां जोडिली जोडी। संतांचें चरण आतां जीवें न सोडीं । । ४ । ।


।। ।।

उदार तुम्ही संत। मायबाप कृपावंत ।। १ ।। 

केवढा केला उपकार । काय वाणूं मी पामर ।। २ ।।

 जडजीवा उद्धार केला। मार्ग सुपंथ दाविला ।। ३ ।। 

सेना म्हणे उतराई । होतां न दिसे कांहीं ।। ४ ।।


।। १० ।।

आजि दिवस धन्य झाला। संत समागम पावला ।। १ ।।

बरवा फळला शकून। अवघा निवारला शीण ।। २॥ 

सुस्नात झालों। संतसागरीं नाहलों ।। ३ ।।

एका जनार्दनी भावें । संतचरणीं लीन व्हावें ।। ४ ॥


।। ११ ।।

संतांचा महिमा कोण जाणे सीमा। सीणला हा ब्रम्हा बोलवेना ।। १ ।।

संतांची हे कला पाहतां न कळे। खेळोनियां खेळ वेगळाची ।। २ ।। 

संतांचिया पारा नेणें अवतारा। म्हणती याच्या पारा कोण जाणे ।। ३ ।। 

नामा म्हणे धन्य धन्य भेट झाली। कल्पना निमाली संतापायी ।। ४ ।।


।। १२ ।।

आता तुम्ही कृपावंत । साधु संत जिवलग ।। १ ।।

गोमतें तें करा माझें । भार ओझें तुम्हांसी ।। २ ।।

वंचिलें तें पायांपाशीं । नाही यासी वेगळें ।। ३ ।।

तुका म्हणे सोडील्या गाठी । दिल्या मिठी पायासी ।। ४ ।।


।। १३ ।।

तुम्ही सनकादिक संत । म्हणविता कृपावंत । । १ । ।

एवढा करा उपकार। देवा सांगा नमस्कार ।।२ ॥ 

भाकावी करुणा विनवा (बैकुंठींचा) पंढरीचा राणा ।। ३ ।। 

तुका म्हणे मज आठवा। मूळ लवकरी पाठवा ।।४।।


।। १४ ।।

कृपा केली संतजनी। लाविलें भजनी श्रीहरिच्या..।।धृ।। 

नाही तरी जातो वायां। लक्ष भोगावया चौऱ्याऐंशी .. । । १ । । 

आणिकं साधनी गुंतता। अभिमान वाढता नित्यनवा.. । । २ ।।

 निळा म्हणें धावणें केलें । सुपंथे लाविले नीट वाटें..।। ३ ।।


।। १५ ।।

नाम घेता वायां गेला। ऐसा कोणें आईकिला ।। १ ।। 

सांगा विनवितों तुम्हांसी। संत महंत सिद्ध ऋषी ।। धृ।। 

नामे तरला नाही कोंण। ऐसा दयावा निवडून ।। २ ।।

 सलगीच्या उत्तरा । तुका म्हणे क्षमा करा ।। ३ ।।


।। १६ ।।

सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला ।

नाम आठविता रुपी प्रगट पै झाला ।। १ ।।

गोपाळा रे तुझें ध्यान लागों मना ।

आनु न विसंबे हरि जगत्रयजीवना ।। २ ।।

तनुमनु शरण विनटलो तुझ्या पायी।

बापरखुमादेवीवरावाचुनि आणु नेणें काहीं।।३।।


।। १७ ।।

काय सांगो आतां संतांचे उपकार। मज निरंतर जागविती ।। १ ।।

 काय द्यावी यासी व्हावें उतराई। ठेवितां हा पायीं जीव थोडा ।। २ ।।

 सहज बोलणें हित उपदेश। करुनी सायास शिकविती । । ३ । ।

तुका म्हणे वत्स धेनूवेच्या चित्ती । तैसें मज येती सांभाळित ।।४।।


।। १८ ।।

संतांच्या विभूती। धर्मालागी अवतरती । । १ । । 

धर्मरक्षणा कारणे। साधू होताती अवतीर्णे ।। २ ।।

जगा लावावे सत्पंथी। हेचि साधूची पै कृती ।।३।। 

एका जनार्दनी साधू। ह्रदयी वसे ब्रह्मानंदू ।।४।।


।। १९ ।।

संतांनीं सरता केलों तैशापरी। चंदनीं ते बोरी व्यापियेली ।। १ ।। 

गुण दोष याती न विचारी कांहीं। ठाव दिला पायीं आपुलियां ।। २ ।। 

तुका म्हणे आलें समर्थांच्या मना। तरी होय राणा रंक त्याचा । । ३ । ।


।। २० ।।

संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।धृ।। 

ज्ञानदेवे रचिला पाया । उभारिलें देवालया ।। १ ।। 

नामा तयाचा किंकर । तेणें केला हा विस्तार ।।२।। 

जनार्दन एकनाथ । ध्वज उभारिला भागवत ।। ३ ।।

 भजन करा सावकाश । तुका झालासे कळस ।।४।।

बहिणी म्हणे फडकती ध्वजा। निरुपणा केलें बोजा ।। ५ ।।


।। जय जय विठ्ठले। विठ्ठले विठ्ठले रखुमाई। श्री हरि विठ्ठले विठ्ठले ।।


 आमचा लेख कसा वाटलं हे आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा 
|| धन्यवाद ||

No comments

Powered by Blogger.