पांगुळ
संत नामदेव महाराज
पांगुळ म्हणजे पहाटे येणारा भिक्षेकरी. पांगुळ म्हणजे नंदीबैल फिरवून भिक्षा मागणारा. संत नामदेवराय अशाच एका पांगुळाचे वर्णन आपल्या रूपके या अभंग प्रकरणातून करताना म्हणतात
विठोबाचा धर्म जागो ।
त्याचे चरणी लक्ष लागो ।। धृ० ।।
जंबु या द्वीपामाजी एक पंढरपूर गांव ।
धर्माचे नगर विठो पाटील त्याचे नाव |
चला जाऊ तया ठायां ।
काही भोजन मागावया ॥१॥
ज्यासी नाही पंख पाय
तेणे करावें ते काय ।
शुद्ध भाव धरूनी पंढरीसी जाय ।
इच्छिले फळ देतो यासी नवलाव ते काय ।। २ ।।
सुदामा ब्राह्मण दुःखें दरिदे पीडिला ।
मुष्टि पोहे घेऊनि त्याचे भेटीलागी गेला ।
शुद्ध भाव देखोनिया गांव सोनियाचा दिला ॥३॥
गण आणि गोत्रज सर्व हासताती मज ।
गेले याचे मानुषपन येणे सांडियेली लाज ।
विनवी तो शिंपी नामा । संतचरणींचा रज ॥ ४॥
संत तथा भक्तशिरोमणी नामदेव महाराज पांगुळाचे वर्णन करताना म्हणतात :
एक पांगुळ पहाटे भक्तीपीठ पंढरपूरकडे चला, शुद्धभाव घेऊन चला, तेथील विठ्ठल तुमच्या इच्छा पूर्ण करेल असं गात चालला आहे. भक्तगण हो; जंबु या द्वीपामध्ये एक पंढरपूर नावाचे गाव आहे. ते धर्माचे नगर आहे. विठो पाटील असे त्याचे नाव आहे. चला आपण सारे त्याच्या गावाला भक्तीरूपी भोजन मागण्याकरिता जाऊया.
विठोबाचा धर्म जागो आणि त्याच्या चरणी लक्ष लागो. ज्याला ज्ञानवैराग्यरुपी पंख नाहीत त्यांनी काय करायचे? तर त्याने शुद्धभाव धरून पंढरीस जावे. तो विठो पाटील तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार फळ देतो. यात आश्चर्य ते काय? दारिद्र दुःखाने गांजलेला सुदामा ब्राह्मण मुठभर पोहे घेऊन त्याच्या भेटीला गेला. त्याच्या अंत:करणातला शुद्ध भाव पाहून त्याला सुवर्णाची नगरी दिली. संतांच्या चरणाची धूळ असणारे शिंपी नामदेवराय म्हणतात माझा देहभाव नष्ट झाला आहे.
माझी ही अवस्था पाहून सर्व गणगोत्रज मला हसतात.
कारण ; 'याचे मनुष्यपण गेले असून याने सर्व लाजलज्जा सोडून दिली आहे' असे ते मला म्हणतात. संत नामदेवांचा हा अभंग भक्तीमार्गाकडे घेऊन जाणारा आहे. पांगुळाच्या माध्यमातून त्यांनी पंढरीची थोरवी गात शुद्धभाव घेऊन पंढरपूरला चला, तो विठ्ठल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल असे म्हटले आहे.
भगवंताकडे शुद्ध भाव, शुद्ध अंतःकरण घेऊन गेलेला बालमित्र सुदामा, त्याच्या मूठभर पोह्याने संतुष्ट होऊन त्याला भगवंताने सुवर्णाची नगरी दिली हे या शुद्ध भावाचे उदाहरण दिले आहे.
आमचा लेख कसा वाटलं हे आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा
|| धन्यवाद ||
Post a Comment