श्री शंकराची भजने

 श्री शंकराची भजने


।। ।।

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची... ।

गळा रुद्राक्षांच्या माळा । लाविले भस्म कपाळा.... आवड..... । । १ । ।

त्रिशुल डमरु हाती । संगे नाचे पार्वती .....आवड....।।।२।।

भोलेनाथा आलो तुझ्या दारी । कुठेही दिसेना पुजारी.... आवड.... । । ३ ।


।। ।।

भोळ्या गिरीजावराला । विसरु नका शंकराला ।।धृ।। 

अर्धांगी पार्वती जटेमध्ये गंगा। भस्म शोभे शोभे सर्वांगा। 

चंद्र शोभे मस्तकाला । विसरु नका शंकराला ।। १ ।। 

अग्नी भडके डोंगराला । गिरीजासंगे देव हा भोळा । 

गाय शोभे गोसाव्याला । विसरु नका शंकराला ।। २ ।।

 वाजे भम भम डमरु बैरी। भुत पिशाच्चे नाचती सारी। 

तुकड्या वंदितो पदाला । विसरु नका शंकाराला ।।३।।


।। ।।

भस्म उटी रुंड माळा । हाती त्रिशुल नेत्री ज्वाला ।। १ ।। 

गजचर्म व्याघ्यांबर । कंठी शोभे वासुकीचा हार ।। २ ।।

 भूते वेताळ नाचती । हर्षयुक्त उमापती । । ३ । ।

सर्व सुखाचे आगर । म्हणे नरहरी सोनार ।।४।।


।। ।।

गौरीहरा दीनानाथा । धरीन तुझे पाय । रुसू नको देवा माझ्या। तुच माझी माय ।

ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय.... ।। धृ।। 

दयावंत म्हणती तुजला। थोर थोर संत। एकरुप झालो आम्हीं । 

दूध आणि साय । ओम नमः शिवाय। ओम नमःशिवाय। ओम नमः शिवाय.... ।। १ ।। 

तुला शोधुनिया देवा । कैक लोक थकले। तुझा ठाव नकळे आतां । 

करूं तरी काय । ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय.... ।। २ ।।


।। ५ ।।

भोळा हा शंकर पुढें नंदीश्वर । तेथें मी पामर काय वर्णू ।। १ ॥ 

भूषण जयाचें भुवना वेगळें । रुंडमाळा खेळें गळ्यामध्यें ।। २ ।। 

कर्पुरगौर भोळा सांब सदाशिव । भूषण धवल विभूतीचें ।। ३॥

 माथां जटाभार हातीं तो त्रिशूल । श्वेत शंख बळें फुंकीतसें ।। ४ ।। 

भांग जो सेवूनी सदा नग्न बैसे । जटेंतूनि वाहे गंगाजळ ।। ५ ।।

 गोदडी घालूनी स्मशानीं जो राहे । पंच वस्त्र होय श्रेष्ठ भाग ।। ६ ।। 

नाम घेतां ज्याचे पाप ताप जाती। पापी उद्धरती क्षणमात्रें ।। ७ ।। 

नरहरी सोनार भक्ति प्रियकर। पार्वती शंकर ह्रदयीं ध्यातो ॥। ८ ।।


।। ६ ।।

शिवाचा अवतार । स्वामी निवृत्ति दातार ।। १ ।।

 तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ।। २ ।। 

सव्य नांदे कैलासराणा । मार्गे गंगा ओघ जाणा ।। ३ ॥

सेना घाली लोटागण । वंदि निवृत्तिचे चरण म्हणा ।। ४।।



।। ७ ।।

श्रीराम जयराम । भवसिंधु तारक नाम ...... ।। १ ।।

नाम पतित पावन। नाम जीवांचें साधन .....।। २ ।।

नाम शिवांचे ध्यान । नाम नारदा गायन......।। ३ ।।

नामा म्हणे हरीचें नाम । नाम तारक परब्रम्ह......।। ४ ।।


।। ।।

भजन करा रे हरिहरा । नारायण शिवशंकरा ।।

माझे बोलणें अवधारा । भेद न करा दोघांचा ।। १ ।।


तुम्हांसी सांगेन सत्य वृतांत । पाहें पां तेथींचा दृष्टांत ।।

नारायणें सेविलें अमृत। झाला श्वेत महादेव ।। २ ।।


शंभूनें गिळिलें हलहला । म्हणोनि विष्णु झाला निळा ।।

देखत देख आंधळा। झणीं होसी गव्हरा ।। ३ ।।


लक्ष्मी रुपें आपण हरु । देवें वरिला शारंगधरु ।।

गरुड रुपें महेश्वरु। वदन झाला विष्णूंचे ।। ४ ।।


शक्तिरुपें शारंगपाणी। नारायण झाला भवानी ।।

शारंगधर नंदी होऊनि । सन्मुखासनीं बैसला ।।   ।।


एक तो एका वेगळा नाहीं। दृष्टांत तूं आगमीं पाही ।।

नामा म्हणे एक केशव ध्यायीं । हरिहर पाहीं ज्यांचे अवतार ।। ६ ।।


।। ।।

अकार उकार मकार ओंकार। प्रणव हा साकार सुरेख रे ..... ।। १ ।। 

सुरामात्र मसार योगी ध्यातीं देहीं । निरंजन पाहीं ब्रम्ह तेंची ...... ।। २ ।।

ज्ञानदेव म्हणे देह झालें देव । प्रणवची शिव अनुभवें ...... ।। ३ ।।


।। १० ।।

शिव भोळा चक्रवर्ती। त्याचे पाय माझे चित्तीं ।। १ ।। 

वाचें वदतां शिवनाम । तया न बाधी क्रोधकाम ।। २ ।। 

धर्म अर्थ काम मोक्ष। शिव देखतां प्रत्यक्ष ।। ३ ।।

एका जनार्दनीं शिव । निवारी कळीकाळाचा भेव । ।४ ।।


।। ११ ।।

शिव-शिव अक्षरे दोन । जो जपे रात्रंदिन ।। १ ।। 

धन्य तयाचा संसार । परमार्थाचे तेच घर ।। २ ।।

 सदोदित वाचे। जपे शिव शिव नाम साचें ।। ३ ।।

एका जनार्दनी शिव । सोपा मंत्र तो राणीव ।।४।।


।। १२ ।।

शिवरात्री कथा धन्य जे ऐकती। इच्छिलें पावती सर्व कांहीं ।। १ ।।

 पातकांचा नाश पुण्य वाढे फार । शेखीं विश्वंभर कृपा करी ।। २ ।। 

भोग भोग्य ज्ञान वाढेल संतान । काळ करी चरण सेवा त्यांची ।। ३ ।। 

नामा म्हणे शिव अक्षरें हीं दोन्हीं। जपावीं सज्जनी वारंवार ।।४।।


।। १३ ।।

बरवें गा शंकरा नाम तुझें । हरहर बरखें गा देवा नाम तुझें ।। १ ।। 

गाईल्या ऐकिल्या होय वैष्णवां गती। रामनामें तरलें नेणों किती ।। २ ।। 

ऐसा सदा आनंद राउळीं । विष्णुदास नामा पंढरपुरीं ।। ३।।


।। १४ ।।

भजन करी महादेव । राम पूजी सदाशिव ।। १ ।। 

दोन्ही देव एक पाहीं । तयां ऐक्य दुजेपण नाही ।। २ ।। 

शिव राम नाहीं भेद। ऐसे देव तेही सिध्द ।। ३ ।। 

जनी म्हणे आत्मा एक । सर्वांघटी तो व्यापक ।।४ ॥


।। १५ ।।

देवा तुझा मी सोनार । तुझ्या नामाचा व्यवहार ।।धृ।। 

मन बुध्दीची कातरी। राम नाम सोने चोरी ।। १ ।। 

नरहरी सोनार हरिचा दास । भजन करी तो रात्रंदिवस । । २ । ।


।। १६ ।।

हरिहरां भेद । नाहीं करूं नये वाद । । १ । । 

एक एकाचे ह्रदयीं। गोडी साखरेच्या ठायीं ।। २ ।। 

भेदकासी नाड। एक वेलांटीच आड ।। ३ ।। 

उजवे वाम भाग। तुका म्हणे एकचि अंग ।।४।।


।। १७ ।।

प्रेम अमृताची धार । वाहे देवाचे समोर ।। १ ।। 

ऊर्ध्ववाहिनी हरिकथा । मुकुटमणि सकळ तीर्थं । । २ ।। 

शिवाचें जीवन । जाळी महादोष कीर्तन ।। ३ ।।

तुका म्हणे हरि । इची स्तुति वाणी थोरी ।।४।।


।। १८ ।।

तूं माउलीहून मायाळ । चंद्राहूनि शीतळ । 

पाणियाहूनि पातळ। कल्लोळ प्रेमाचा ।।१।। 

देऊं काशाची उपमा। दुजी तुज पुरुषोत्तमा । 

ओंवाळूनि नामा | तुझ्यावरुनि टाकिलों ।। २ ।।

तुवां केलें रे अमृता। गोड त्याही तूं परता । 

पांचा तत्वांचा जनिता। सकळ सत्तानायक ।। ३ । 

कांहीं न बोलोनि आतां । उगाच चरणीं ठेवितों माथा । 

तुका म्हणे पंढरीनाथा। क्षमा करीं अपराध ।।४।।


।। १९ ।।

जे शंभूने धरिलें मानसीं । तेंचिं उपदेशिलें गिरीजेसी ।। १ ।।

 नाम बरवें बरवें । निज मानसीं धरावें ।। २ ।। 

गंगोदकाहूनी निकें । गोडी अमृत जालें फिकें ।। ३ ।। 

सीतळ चंदनाहुनि वरतें। सुंदर सोनियाहूनी परतें ।। ४ ।। 

भुक्तिमुक्तिदायक। भवबंधनामोंचक ।। ५ ।। 

बापरखुमादेविवरें। सुलभ नाम दिधलें सोपे रें ।। ६ ।।


।। २० ।।

वेदशास्त्री गायिला पुराणी वर्णिला । तो शिव पाहिला डोळेभरुनी ।। १ ।। 

तेणे माझ्या मना होय समाधान। आठवितो चरण वेळोवेळा ॥। २ ।।

 सकळ इंद्रियां झाली पैं विश्रांती। पाहता ती मूर्ती शंकराची ।। ३ ।।

 एका जनार्दनी शिव हा भजावा। संसार करावा सुखरुप ।। ४ ।।


।। २१ ।।

शंकराला माझ्या। महादेवाला माझ्या । आवडते बेलाचे पान .. ।। धृ ।। 

गळयात शोभती रुद्राक्ष माळा । पायात नुपूर छान-२ ।। १ ।।

जटेतून वाहे झुळझुळ गंगा। डोक्यावरी चांदोबा छान-२ .. ।। २ ।। 

महादेवाच्या हातात डमरु त्रिशुल। पायांत खडावा छान-२ .. ।। ३।। 

बेलपत्रावरी शंकाराची प्रिंटी। कपाळी भस्म शोभे छान - २ .. ।। ४ ।। 

घेऊन रूप भिल्लिण आली। कैलासी नाचतो छान - २ .. ।। ५ ।। 

डोळे उघडून शंकर पाईं। पार्वती दिसतेया छान-२ .. ।। ६ ।। 

 शंकराच्या मांडीवरी गिरीजा गणपती। शोभून दिसतोया छान - २ .. ।। ७ ।।

      

।। ॐ नमः शिवाय  ॐ नमः शिवाय ।।



 आमचा लेख कसा वाटलं हे आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा 
|| धन्यवाद ||

No comments

Powered by Blogger.