श्री गणपतीची भजने -१

 श्री गणपतीची भजने - 


।। ।।

चिंतामणिदेवा गणपतीसी आणा। करवावें भोजना दुजे पात्रीं ।। १ ।। 

देव म्हणती तुकया एवढी कैंची थोरी। अभिमानाभीतरी नागवलों ।। २ ।। 

वाड वेळ झाला शिळें झालें अन्न । तटस्थ ब्राह्मण बैसलेती ।। ३ ।। 

तुका म्हणे देवा तुमच्या सुकृतें। आणीन त्वरित मोरयासी । । ४ । ।


।। ।।

आधी मन घेई हाती। तो गणराज गणपती।।धृ।। 

मन इंद्रियांचा राजा । त्याची सर्व भावें पूजा ।। १ ।। 

मन जीविचे प्रधान । मन माझे नारायण ।। २ ।।

तुका म्हणे मन चंचल । हाती येईल गुरुचे बळ ।। ३ ।।


।। ।।

विद्या सुख दाता तो हा गजानन । ओंमकार स्वरुपी प्रगटला ।।धृ।। 

तयाचिया स्मरणे सुरवर करणे। मुनीजन गाती नाम तयाचें । । १ । । 

निजदास म्हणे मज निरंतर । नाम तयाचें विघ्नविनाशक । । २ । ।


।। ।।

अर्पूणियां देवा भावाचे मोदक । भावें विनायक पूजा करूं।।धृ।। 

देखिले मी गजमुख हरपले जन्मदुःख । गेली तहानभूक मायाजाल ।। १ । 

चित्त दुर्वा दल अर्पिले चरणी। गेले हरपोनी काया वाचा मन ।। २ ।। 

एका जनार्दनी वरदविनायक । स्मरताचि पातके नाशितातीं ।। ३ ।।


।। ५ ।।

करूं प्रथम नमन । वंदू देव गजानन ।।धृ।। 

सकल सिध्दिचा हा दाता। आली विघ्ने निवारीता । । १ ।। 

गौरीहराचा तो सुकुमार । नाव त्याचे लंबोदर ।। २ ।। 

देव गणांचा हा गणपती । तुका म्हणे राहो चित्ती ।। ३ ।।


।। ६ ।।

ओमकार प्रधान रूप गणेशाचे। हे तिन्हीं देवांचे जन्मस्थान ।। धृ।।

 अकार तो ब्रम्हा उकार तो विष्णू। मकार महेशु जाणियेला ।। १ ।। 

ऐसे तिन्हीं देव जेथोनी उत्पन्न। तो हा गजानन मायबाप । । २ ।। 

तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी। पाहावी पुराणी व्यासाचिया । । ३ । ।


।। ७ ।।

देव गजानन कृपेचा सागर । करु नमस्कार त्याचे पायी।।धृ।। 

पूजन करीता संकटे नाशती । करी भक्तांप्रती सुखरुप ।। १ ।। 

मोदकांची आवडी उंदीर वाहन। सिंदूरवर्ण शोभतसे ।। २ ।। 

नामा म्हणे ऐसा दीनांचा दयाळ । करीतो सांभाळ सर्वांचा हा ।। ३ ।।


।। ।।

प्रथम नमन करूं गणनाथा । उमा शंकराचिया सुता ।।

चरणावरी ठेवूनि माथा। साष्टांगी आतां दंडवत ।। १ ।।

ऐसे नमन करोनि सकळां । हरीकथा बोले बोबड्या बोला ।।

अज्ञान म्हणोनि आपल्या बाळा । चालवी सकळां नामा म्हणे  ।। २ ।।


।। ।।

नमिला गणपती माऊली शारदा । आता गुरुराया दंडवत ।।धृ।। 

गुरुराया चरणी मस्तक ठेविले। आपुल्या स्तुतिला द्यावी मती । । १ । । 

गुरुराया तुज ऐसा नाही कोणी सखा। कृपा करी रंका धरी हाती ।। २ ।। 

तुका म्हणे माता-पिता-गुरु-बंधू । तुची कृपासिंधू पांडूरंगा।। ३ ।।


।। १० ।।

गणराया लवकर येई। भेटी सकलांशी देई ।।धृ।। 

अंगी शेंदुराची उटी। केशर कस्तुरी लल्लाटी । । १ । ।

 पायी घागुऱ्या वाजती। नाचत आले गणपती ।। २ ।। 

अवघ्या गणांचा गणपती। हाती मोदकांची वाटी ।। ३ ।। 

तुका म्हणे शोधूनी पाहे । विठ्ठल गणपती दुजा नोहे ।।४।।


।। ११ ।।

रांगोळी घातली गुलालाची। स्वारी आली गणरायाची।।धृ।। 

दुर्वा-पुष्प बहुप्रिय झाला । हार रत्नांचा शोभला ।। १ ।। 

नैवेद्य मोदकांचा केला । प्रसाद वाटून काला केला ।। २ ।। 

अष्टविनायक नानारुपे । नामही घेता जळती पापे । । ३ । ।

 दास म्हणे श्रीगणराया। मस्तक माझे तुमच्या पाया ।।४ ।।


।। जय जय रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी।।



 आमचा लेख कसा वाटलं हे आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा 
|| धन्यवाद ||


No comments

Powered by Blogger.